धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि धाराशिव मध्यवर्ती बस स्थानक ते भवानी चौक सांजा दरम्यानचा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा.  अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत शुक्रवारी (दि. 26) निवेदन देण्यात आले.


शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव - कळंब विधानसभा मत्तदार संघाचे आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागणीचे निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मध्यवर्ती बस स्थानक ते मवानी चौक-सांजा नाका रहदारीच्या रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत, या रस्त्यावर नामांकित शाळा व कॉलेज असल्यामुळे शाळा व कॉलेजचे विद्यार्थी यांना रस्त्यावरून ये-जा करताना नाहक त्रास होत आहे.परिणामी आतापर्यंत छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत हा रस्ता अनेक गावासाठी शहरात प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता असल्यामुळे सर्वसामान्य वयोवृद्ध विद्यार्थी या वरून प्रवास करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात यावर रहदारी आहे, त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


यावेळी शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी  नगरसेवक सिद्धेश्वर कोळी,प्रदीप मुंडे,राणा बनसोडे,उपशहर प्रमुख बंडू आदरकर,राकेश सूर्यवंशी,नाना घाटगे,जगदीश शिंदे,गणेश साळुंके,संकेत सूर्यवंशी, अमित उंबरे, मनोज उंबरे, सुमित बागल, ओम जाधव, सतीश लोंढे, संदीप शिंदे, यशवंत शहापालक,वैभव पाटील, राकेश कचरे, बालाजी मगर, राजदीप गायकवाड, महेंद्र शिंदे, पृथ्वीराज देडे, प्रवीण केसकर, सुनील कुंभार, योगेश गरड, सिद्दिक तांबोळी, राम झाडके यांचेसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. 

 
Top