धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब पंचायत समितीअंतर्गत अधिग्रहण संचिका गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित असून अधिग्रहण मोबदल्याची 7 लाख 76 हजार 800 रुपये रक्कम रखडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हर्षदा ज्ञानेश्वर गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कळंब पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले तत्कालीन वीज तंत्री बी. बी शिंदे यांना तहसिलदार यांच्या अधिग्रहणातील आदेशानुसार रक्कम वसूल करून संबंधीत शेतकऱ्यास अदा करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच गट विकास अधिकारी यांनी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधीताकडून 10 दिवसात शेतकऱ्यांना मोबदला रक्कम 7 लाख 76 हजार 800 रुपये वसूल करून भरणा करण्याबाबत सूचना दिलेली आहे.
परंतू सदरची वसुली संचिका गटविकास अधिकाऱ्यांकडून 12/07/2021 रोजी पाठवून देखील आजतागायत पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबीत आहे. तसेच ग्रामीण पाणी पूरवठा विभागातील यांत्रिकी उपअभियंता जाणूनबुजून सदरची संचीका प्रलंबीत ठेवून संबंधीत कर्मचाऱ्याची पाठराखण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विलंबास जवाबदार असण्याऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ महाराष्ट्र जिल्हा परिषद वर्तणूक नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही रुन तात्काळ रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री.चौगुले हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच सन 2014 ते 2016 या कालावधीत अधिग्रहणाचा मोबदला संबंधीत शेतकऱ्यांना न मिळाल्यामूळे कनिष्ठ अभियंता बी.बी. शिंदे यांच्या वेतनातून तहसिलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांच्या आदेशानुसार तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावी. सदरील मोबदला संबंधीत गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात यावे, असेही हर्षदा ज्ञानेश्वर गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.