तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आल. निवेदनात असे सांगण्यात आले की, दि.14 जुलै 2024 रोजी विशालगडावरील अतिक्रमण विरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. तरी सुध्दा महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून बेकायदेशीर पध्दतीने जमाव गोळ करण्यात आला व जमावाला भडकावण्याचे काम सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले गेले. आलेल्या जमावाने विशालगळापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या मुस्लीमवाडी व गजापूर गावात असलेल्या मुस्लिम समुदायाची घरे जाळणे, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करुन जखमी करणे, स्त्रिया व लहान मुले-मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे, जीवघेणा हल्ला करणे, स्थानिक रहिवाशी असलेल्यांच्या घरातील मौल्यवान दागिने व वस्तु चोरणे व जबरस्ती घरात घुसुन तोडफोड करणे, मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाची तोडफीड करुन धार्मिक भावना दुखावणे. यासारखी गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेले आहेत. आम्ही महाविकास आघाडी खालीलप्रमाणे कारवाईची मागणी करत आहोत.
हिंसाचार व जाळपोळ करुन सामाजीक सलोखा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करावी. गजापूर येथील हिंसाचारात जे काही आर्थिक नुकसान तेथील नागरीकांचे झाले आहे त्यांना नुकसान भरपाई दयावी. शेकडो वर्षापासून प्रार्थनास्थळे आहेत त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी. मुस्लीम समाजावर सतत होणाऱ्या अत्याचार विरोधात पोलीस अधिक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्हयात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्हयात करावी.
सोशल मीडीयात मुस्लीम समाजाबददल आणि त्यांच्या आस्थेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडीओ बनवणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा उपप्रमुख श्याम पवार, काँग्रेस पक्षाचे तुळजापूर युवा नेते ऋषीकेश मगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष तौफिक शेख, तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख, युवक प्रभारी तालुकाध्यक्ष शरद जगदाळे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद भाई शेख, युसुफ शेख, आरिफ बागवान, जुबेर शेख, शाहरुख बागवान, वसीम बागवान, जमीर शेख, कलीम शेख, रियाज शेख तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी, मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.