धाराशिव  (प्रतिनिधी) - तालुक्यातील महाळंगी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दि.२८ जुलै रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविक दिवसभर मोठ्या संख्येने हजेरी लावली.

धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथे शिवसेनेचे धाराशिव शहर संघटक तथा उद्योजक प्रशांत साळुंके यांच्या शेतात मशागतीसाठी खोदकाम करताना श्री महालक्ष्मीची मूर्ती आढळून आली होती. त्या लक्ष्मीची विधीवत प्रतिष्ठापना करुन भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. या देवीच्या दर्शनासाठी संततीप्राप्तीसाठी हजारो भाविक नवस बोलतात. विशेष म्हणजे संततीप्राप्ती झालेले दांपत्य येथे नवसपूर्तीसाठी येतात. दि.२८ जुलै रोजी सकाळी देवींची मूर्ती व पालखीचे पूजन पुजाऱ्यांच्या हस्ते विधीवत करण्यात आले. त्यानंतर मानकरी भारत ढवळे यांच्या निवासस्थानापासून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान, पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांची नवसपूर्ती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. या यात्रेत महाळंगीसह चिखली, रूईभर, आंबेवाडी, बेंबळी व पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. देवीची आरती ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, सुधीर पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी सरपंच व्यंकट पाटील, गौतम पाटील, भारत ढवळे, जीवन पाटील, आयोजक प्रशांत साळुंके यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 
Top