धाराशिव (प्रतिनिधी)- नविन फौजदारी कायद्यातील तरतुदीमुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवताना योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती आणि प्रसारण मंत्रालय,भारत सरकार सोलापूर आणि पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आज 23 जुलै रोजी “ नव्या भारताचे नवीन कायदे “ या विषयावर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री.अतुल कुलकर्णी बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.वसंत यादव,अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन,क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण,जिल्हा विधीज्ञ मंडळचे अध्यक्ष एड.प्रल्हाद जोशी,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचे निवृत्त न्यायाधीश मुकुंद सस्ते,माजी अध्यक्ष रवींद्र कदम,श्रीमती वरपे आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभावित व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा तपास आणि खटला कार्यक्षम रीतीने पार पाडण्यासाठी नवीन गुन्हेगारी कायद्यांमध्ये अत्यंत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत असे श्री.कुलकर्णी यांनी सांगितले.
भारतीय न्याय संहिता,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही कायदे शिक्षेपेक्षा न्यायावर लक्ष केंद्रित करणे, सर्व मार्गाने जलद न्याय प्रदान करणे, न्यायिक आणि न्यायालय व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे, 'सर्वांना न्याय मिळणे' यावर जोर देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे,असे न्या.वसंत यादव यांनी सांगितले. निवृत्त न्यायाधीश मुकुंद सस्ते यांनी नवीन फौजदारी कायद्यातील न्यायालयीन प्रक्रियेमधील विविध तरतुदींविषयी विस्तृत स्वरूपात माहिती दिली. नवीनतम आणि सुधारित कायदे ही सरकारने केलेली चांगली सुरुवात आहे.तिन्ही कायद्यांचे उद्दिष्ट केवळ 'शिक्षा' पेक्षा 'न्याय' ला प्राधान्य देण्याचे आहे,जे ब्रिटिश वसाहती-काळातील मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवते असे ऍड.प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक अंकुश चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अंबादास यादव यांनी मानले.विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन फौजदारी कायद्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यामधील विविध तरतुदी,गैरसमज व वस्तुस्थिती या विषयाची मांडणी करण्यात आली आहे.हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य बघता येणार आहे.तसेच क्यू आर कोड स्कॅन करून प्रदर्शनाची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवता येणार आहे.कार्यक्रमाला डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय,गुरुवर्य आर.जी.शिंदे विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक,विदयार्थी,वकील,पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.