धाराशिव (प्रतिनिधी)- आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील राखीव जागासंदर्भात सरकारने चुकीचा आदेश काढल्याने गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले.

गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा व 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी आणि राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा थांबावावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या प्रकाराचे निवेदन शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवार 1 जुलै रोजी दिले. निवेदनात म्हटले की, आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसंदर्भात राज्य सरकारने चुकीचा आदेश काढला आहे. हा आदेश शिक्षण हक्कविरोधी असल्यामुळे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. तरीही सरकारने हा आदेश अद्याप मागे घेतला नसल्यामुळे 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या लाखो पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी शाळांतील राखीव जागांवरील प्रवेशाच्या अपेक्षेने लाखो पालकांनी अर्ज भरले आहेत. 

निवेदनावर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राजाभाऊ पवार, बापू साळुंके, रवी वाघमारे, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे प्रदीप मुंडे, प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, बंडू आदरकर, गणेश आसलेकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, देवानंद एडके, सतीश लोंढे, नाना घाटगे, विष्णू यमपुरे, पंकज पडवळ,  अजिंक्य राजेनिंबाळकर, पांडुरंग भोसले, हनुमंत देवकते आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top