धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर महिनाभरात जम्मू आणि काश्मिरमध्ये 7 दहशतवादी हल्ले झालेले आहेत. यामध्ये भारतीय सैन्य दलातील 13 जवान शहीद झाले. ही घटना देशाला भूषणावह नाही. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि स्वतः प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.18) केंद्र सरकारच्या विरोधात धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत मोदी सरकारचा निषेध ही यावेळी करण्यात आला.
धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख तथा नगर परिषदेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव म्हणाले, प्रधानमंत्रीपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतल्याच्या घटनेला महिना पूर्ण झाला नाही तोपर्यंत जम्मू आणि काश्मिरमध्ये महिनाभरात दहशतवादी हल्ल्याच्या 7 घटना घडल्या. यामध्ये भारतीय सैन्य दलातील 13 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांची राजनाम्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. या आंदोलनात धाराशिव नपचे माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंके, राजाभाऊ घोडके, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, सिध्देश्वर कोळी, पांडूरंग भोसले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.