धाराशिव (प्रतिनिधी) - वाहनांना पासिंग करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) माध्यमातून प्रती दिवस 50 रुपये अवाजवी दंड आकारण्यात येत आहे. तो दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी गेल्या 3 महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. मात्र दंड आकारणे चालू आहे. चालू असलेली ती दंड आकारणी बंद न केल्यास दि.15 व 16 जुलै रोजी ऑटो रिक्षा बंद करून रिक्षा चालक संपावर जाणार असल्याचा इशारा एकता ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे दि.11 जुलै रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रिक्षा चालकांच्या रिक्षांची पासिंग मुदत संपल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ) वाहनाची पासिंग करण्यासाठी प्रती दिवस 50 रुपये अवाजवी दंड आकारण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. मुळातच रिक्षा चालकांना दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुपये उत्पन्न या रिक्षापासून मिळते. त्यातच वाढलेली महागाई व रिक्षाची देखभाल दुरुस्ती लक्षात घेता ते 50 रुपयांचा दंड भरु शकत नाहीत. त्यामुळे शासनाने वसूल केल्या जाणाऱ्या अवाजवी दंडाचा निर्णय तात्काळ मागे घेऊन राज्यभरातील रिक्षा चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वारंवार केली आहे. मात्र सरकारने रिक्षा चालकांचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. जर हा निर्णय रद्द नाही केला तर दि.15 व 16 जुलै रोजी रिक्षा बंद ठेवून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर उस्मानाबाद जिल्हा मोटार चालक मालक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मैनोद्दीन पठाण, एकता ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमालोद्दिन तांबोळी, जिल्हा सचिव बुबा उंबरे, प्रभाकर निंबाळकर, योगेश आतकरे, शंकर शितोळे, बजरंग पवार, अमीर मुजावर, धर्मा दुपारगुडे, कलीम शेख, राजू शेख, संतोष कांबळे, सुरेश सरवदे, विजय गवळी, रमेश माळी यांच्या सह्या आहेत.


 
Top