धाराशिव (प्रतिनिधी)-  खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. 9 जुलैपर्यंत 5 लाख 15 हजार 528 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी 2 टक्के अधिक म्हणजेच 102 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक 4 लाख 16 हजार 267 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. 

कृषी विभागाच्या वतीने यंदा खरीप पेरणीसाठी 5 लाख 4 हजार 736 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकून घेतली होती. पावसाचीही बळीराजास यंदा जास्त प्रतिक्षा करावी लागली नाही. जून महिन्याच्या 8 तारखेपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. 9 जुलैपर्यत तब्बल 5 लाख 15 हजार 582 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

सोयाबीनचा पेरा 4 लाख 16 हजार 267 हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. त्याची टक्केवारी 140 इतकी आहे. 36 हजार 444 हेक्टवर तूर, 10 हजार 605 हेक्टरवर मूग, 43 हजार 478 हेक्टवर उडदाचा पेरा झाला आहे.

 
Top