धाराशिव (प्रतिनिधी)-विधान परिषद निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीने समाजवादी पार्टीला काही विचारलेले नाही. त्यामुळे मजबुरीके साथ आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत असे मत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
समाजवादी पार्टीच्या बैठकीसाठी होगाडे रविवार दि. 14 जुलै रोजी धाराशिवमध्ये आले होते. दुपारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. होगाडे यांनी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समाजावादी पार्टी 30 ते 35 जागा लढवणार आहे. या संदर्भात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये निश्चित झाल्यानंतर जागा वाटप फायनल होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी देशात तिसऱ्या क्रमांकावर व महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या 19 जुलै रोजी निवडून आलेल्या देशातील 37 खासदारांचा सत्कार मुंबईत होणार असल्याचेही होगाडे यांनी सांगितले. येत्या 9 ऑगस्ट रोजी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची विराट सभा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी, प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी, महासचिव डॉ. रौफ शेख, ॲड. रेवण भोसले, नांदेड जिल्हाध्यक्ष हैदर पटेल, धाराशिव जिल्हाध्यक्ष शाहुराज खोसे आदी उपस्थित होते.
सव्वा दोन कोटी प्रिपेड मिटरचे टेंडर का काढले
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळेस प्रिपेड मिटर सामान्य ग्राहकांना बसले जाणार नाही. फक्त सबस्टेशनस, फीडर्स, ट्रॉन्सफॉर्मर्स, शासकीय कार्यालयासाठी आहे असे सांगितले असले तरी फक्त 15 लाख प्रिपेड मीटर यासाठी लागतात. मग सव्वा दोन कोटी प्रिपेड मीटरची ऑर्डर का दिली असा सवाल समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आजही स्मार्ट प्रिपेड मीटरची ऑर्डर रद्द केली नाही असे सांगितले. यामध्ये त्यांनी प्रिपेड मीटर बसवल्यामुळे वीज गळती, भ्रष्टाचार, वीज चोरी कमी होणार नसल्याचेही सांगितले.