धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोलापूर रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक विभागीय कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.

लातूर- कुर्डुवाडी हा रेल्वे मार्ग पुर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग होता. सन 2004 मध्ये या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेमार्गात बदल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये रेल्वे विभागाने अतीक्रमण करुन रेल्वे विद्युतीकरणाचे पोल रोवले आहे.  शेतकऱ्यांकडून अशा अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने रेल्वे विभागाने अधिकचे भुसंपादन केले आहे का व केले असल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यास देणेबाबत व भुसंपादन केले नसल्यास सदर जमीन रेल्वे विभागाची असल्याचा भक्कम पुरावा देणेबाबत आजच्या बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या.

रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत रेल्वे मार्गाच्या बाजूचे रस्ते व रेल्वेस्टेशनकडे जाणारा रोड अशा अनेक प्रकारची कामे केलेले आहेत. ही कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून या संदर्भात गेल्या 5 वर्षापासूनचा अहवाल व कामाची तपासणी करुन घेण्याची सुचना करण्यात आली.

धाराशिव रेल्वे स्टेशनचे अमृत अटल योजनेंतर्गत विकास करण्याचे काम प्रगतीपथावर असून या कामाचा उच्च दर्जा राखावा व प्रत्येक महिण्याला या कामचा आढावा घेण्यात येईल असे सुचीत करण्यात आले आहे.  

धाराशिव- तुळजापुर- सोलापूर या प्रस्तावित नविन रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून ते काम तीन टप्यात पुर्ण होणार आहे. यातील पहिल्या टप्यातील जमीनीचे 70% जमीनीचे अधिग्रहण झाले असून 95%  भुसंपादन झाल्यानंतरच रेल्वे लाईनचे प्रत्यक्ष काम सुरु होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगीतले.

रेल्वे मार्गाचे भुसंपादन लवकर करणे व सदरचे रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने होण्याच्या उद्देशाने रेल्वेचे उच्च पदस्त अधिकारी व जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजीत करण्याची सुचना करण्यात आली.

यावेळी सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक निरजकुमार डोहरे, शैलेंद्रसिंग परीहार (सी.पी.एम.), प्रदिप बनसोडे (उपअभियंता बांधकाम),सचिन गाणेर, एम. जगदिश, योगेश पाटील, आदित्य, एस. बी. कुलकर्णी आदीसह मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

 
Top