धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. राज्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर आहेत. तसेच इतर सरकारी योजनेचे काम सुरू असल्याने अधिकारी बैठकीत व्यस्त आहेत. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षक विभागाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गुटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची मुदत संपत आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे प्रवेशासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत. 12 वीमध्ये व सीईटीमध्ये चांगले मार्क मिळून देखील केवळ जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतल्यास संबंधित महाविद्यालयाचे शुल्क परवडणारे नाहीत. शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्यासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुन्हा सीईटी परिक्षा द्यावी लागणार आहे. परिणामी त्यांचे एक वर्ग वाया जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.