परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संवाद मेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे ,वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष काळे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात तसेच आरटी बार्टी महाज्योती व सारथी इत्यादी फेलोशिप संदर्भात पदवी पदव्यूत्तर विषयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात तसेच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते चालू शैक्षणिक वर्षांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबवत असताना येणाऱ्या अनेक समस्या व विद्यार्थ्यांच्या आवडीने शिक्षण घेता यावे यासाठीचे विद्यार्थ्यासोबत प्राध्यापकासोबत शिक्षकासोबत चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्न उभे करत सर्वांच्या समस्या सोडवल्या जातील असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. महेश कुमार माने, डॉ. संतोष काळे यांनी सहकार्य केले.