उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी बनविण्याच्या दारूच्या अड्ड्यावर मंगळवारी, (दि.21) सकाळी पोलिसांनी धाड टाकून अड्डा उध्वस्त केला. या धाडीत सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, उमरगा शिवारात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसाना मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी पोलिस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पोहेकॉ अतुल जाधव, प्रदिप ओहळ, पोलीस नाईक आय. एच. पठाण आदि पोलीस कर्मचाऱ्यासह उमरगा शिवारात सुरू असलेल्या गावठी व हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात गुळ मिश्रीत रसायनासह गावठी हातभट्टी दारू आढळून आली. यात 200 लिटर क्षमतेच्या 14 बॅरल मध्ये गुळ मिश्रीत 2 हजार 800 लिटर रसायन व 60 लिटर गावठी दारूसह 1 लाख 45 हजार 400 रुपये रूपयांचा मुद्देमाल जप्त करून गावठी दारू बनविण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. दरम्यान पोलिस येत असल्याचा सुगावा लागताच झाडा झुडपाचा फायदा घेत सलीम मकबूल शेख (रा डिग्गी रोड, उमरगा) पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी पोहेका प्रदिप ओहळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सलीम शेख याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका लक्ष्मण शिंदे हे करीत आहेत.
तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू व्यवसायिका विरुद्ध कडक मोहिम हाती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी पळसगाव तांडा तलावालगत सुरू असलेल्या दोन गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून सव्वा दोन लाखांचा मुद्देमालासह दोन्ही अड्डे उध्वस्त केले होते. तर उमरगा शिवारात गावठी हातभट्टी बनविण्याच्या दारूच्या अड्ड्यावर मंगळवारी सकाळी धाड टाकून सुमारे दिड लाखांचा मुद्देमालासह अड्डा उध्वस्त केला. दरम्यान या कारवाईमुळे अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.