कळंब (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते. यावेळी मात्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे यांनी पंढरपूर येथे शासकीय पूजेला न येता घरात बसूनच पांडुरंगाची पूजा करावी असे मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.

कारण मराठा आरक्षण मागणी करता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या ओबीसीतून मागणीसाठी 26 जानेवारी 2024 रोजी नवी मुंबई येथील वाशी येथे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव महिला मुलांसह दाखल झाले होते. वाशी मुंबई येथून सर्व मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे दाखल होणार होते. परंतु महाराष्ट्र सरकार वारंवार वेगवेगळे प्रस्ताव मराठा आंदोलक आझाद मैदानात पोहचू नये म्हणून पाठवत होते. यावेळी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये तसेच सरकारच्या प्रस्तावांचा मान राखून एक दिवस वाशी येथे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुक्कामी राहिले. 

दुसऱ्या दिवशी दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे भव्य सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठ्यांच्या आरक्षणाच्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत व आम्ही ते लागू करत आहोत असे सांगितले. यावेळी जमलेल्या लाखोंच्या मराठा समाज बांधवांसमोर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतोय की मी गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही मराठा समाजाच्या वेदना माहित आहेत. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करेल दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे.

तसेच स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांनाही अभिवादन करतो. हे सरकार माझे तुमचे सरकार आहे आम्ही मतांसाठी नाहीतर हितासाठी निर्णय घेतलेले आहेत सर्वसामान्यांना न्याय देण्याचे निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. कुणबी दाखले आपण काढले आहेत. सगेसोयरे बाबत अधिसूचना आपण काढली आहे. वंशावळ सुनावणीसाठी आपण समिती नेमली आहे. मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार सवलती दिल्या जातील. तसेच मराठा आरक्षणातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना नोकऱ्या दिल्या जातील असे भर सभेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. 

यापैकी एकही आश्वासन अद्यापही सहा महिने पूर्ण होवून गेले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे अशी खोटी आश्वासने देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी मराठा बहुजन समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या शासकीय पुजेला न येता घरातूनच पांडुरंगाची पूजा करावी. कारण मराठा समाजाला फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. कारण आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या आजही थांबलेल्या नाहीत. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आहेत. असे मराठा समाज समजतो. तरी मुख्यमंत्र्यांना आपल्या दिलेल्या शब्दावर जरा जरी विश्वास असेल तर त्यांनी पंढरपुरात शासकीय पूजेस येण्याचे टाळावे अशी मागणी राज्यातील सकल मराठा समाज करत आहे. असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकावर सतीश काळे, वैभव जाधव, रावसाहेब गंगाधरे, नकुल भोईर, गणेश दहिभाते, अभिषेक म्हसे, संतोष शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top