धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी योजना आहे.या योजनेच्या लाभासाठी 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा,घटस्फोटीत, परीतक्त्या,निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. गावपातळीवर या योजनेसाठी ग्रामस्तरीय पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 11 जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील 75 हजार 702 महिलांनी अर्ज केले. यामध्ये 15 हजार 344 ऑनलाइन अर्जाचा समावेश आहे. 

धाराशिव एकात्मिक बाल विकास प्रकल्प (नागरी प्रकल्प) अंतर्गत कार्यरत 167 अंगणवाड्यांच्या माध्यमातून 8496 महिलांनी तर 2251 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी प्रकल्प अंतर्गत एकूण 2052 अंगणवाड्या कार्यरत असून या प्रकल्पांतर्गत 11 जुलैपर्यंत 60 हजार 358 महिलांनी प्रत्यक्ष आणि 15 हजार 344 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता व लागणारे आवश्यक कागदपत्रे हे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा  लाभ मिळण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 
Top