धाराशिव (प्रतिनिधी)- रेशीम शेती हा खात्रीशीर उत्पन्न देणारा उद्योग आहे.शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग करणे आज काळाची गरज आहे.या शेतीपासून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे.कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न देणारे व शेतकऱ्यांची भरभराट हे पीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन आपली आर्थिक प्रगती करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले.
राज्यातील पहिल्या सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त रेशीम चॉकी सेंटर वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील रेशीम उद्योजक शेतकरी अतुल लुगडे यांनी सुरू केले. उद्घाटन प्रसंगी डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रूपल धरमकर, जिल्हा रेशीम अधिकारी आरती वाकुरे,वाशीचे तहसिलदार राजेश लांडगे,आयसीआयसीआय फाउंडेशनचे झोनल हेड दीपक पाटील,प्रकल्प व्यवस्थापक चेतन पाटोळे,व्हाईट गोल्ड चॉकी सेंटरचे अध्यक्ष अतुल लुगडे,रेशीम शेती तज्ज्ञ व उद्योजक शेतकरी बालाजी पवार, गणेश आदटराव व सुनील मसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ ओंबासे पुढे म्हणाले की, कोणताही उद्योग करण्यासाठी धाडस करावे लागते.उद्योग उभा करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यासाठी बँकेचे कर्ज घेणे आवश्यक असते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष, बालाजी पवार, चेतना पाटोळे, अतुल लुगडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञान प्रबोधिनीचे थोरबोले यांनी केले. उपस्थितांचे आभार अतुल लुगडे यांनी मानले.कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील रेशीम उत्पादक शेतकरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.