भूम (प्रतिनिधी) राज्यातील महिलांना आर्थिक सबल करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आहे . या योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणीला प्रति महिना 1 हजार 500 रुपये महिना शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत . भूम तालुक्यातून शहरी भागातून 5 हजार 194 तर ग्रामीण भागातून 27 हजार 857 असे एकूण 33 हजार 51 महिलांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ देण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे . गुरुवार दि 18 रोजी पर्यंत शहरी भागातून 1 हजार 191 तर ग्रामीण भागातून 12 हजार 933 अर्ज असे एकूण 14 हजार 124 अर्ज प्राप्त झाले आहेत.
दिलेल्या उद्दिष्टानुसार ग्रामीण भागातून 46.42 टक्के तर शहरी भागातून 22.93 टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत . प्राप्त अर्जांमध्ये शहरी भागातून म्हणावा तसा प्रतिसाद नाही मात्र ग्रामीण भागातून अर्ज सादर करण्याचा वेग चांगला आहे . शहरी व ग्रामीण भागातील 14 हजार 124 अर्जांची छाननी चालू केली आहे . आजवर झालेल्या अर्जाच्या छाननीत शहरी भागातून 1030 तर ग्रामीण भागातून 8 हजार 262 अर्ज या समितीने केलेल्या छाननीमध्ये योजनेसाठी पात्र झाले आहेत. उर्वरित अर्जाची छाननी टप्प्या टप्प्याने चालू आहे . पात्र अर्जाची यादी त्या त्या गावात लावली जाणार आहे . तसेच जे अर्ज अपात्र झाले आहेत त्यांनाही अपील करण्याची संधी दिली जाणार आहे.
सद्य स्थितीला या योजनेचे अर्ज शहरात नगरपालिका कार्यालयात तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी सेविका यांच्याकडे केले जाऊ शकतात . तसेच स्वतः मोबाईल अँप च्या माध्यमातून , आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतो आहे . इच्छुक महिलांनी आपले अर्ज लवकरात लवकर ऑफलाईन , ऑन लाईन पद्धतीने लवकर सादर करावेत. - जयवंत पाटील तहसीलदार भूम.
भूम पं स मध्ये विशेष कक्ष लाडकी बहीण योजनेसाठी चालू केलेला आहे . त्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा . तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात ऑन लाईन व ऑफ लाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याचा लाभ घ्यावा . या संबंधी काही अडचण असल्यास थेट संपर्क साधावा. आर व्ही चकोर (ग वि अ भूम पं स).