धाराशिव (प्रतिनिधी) - ओबीसींचे राजकीय आरक्षण न्यायमूर्ती खानविलकर यांच्या निकालामुळे स्थगित झालेले आहे. तर शैक्षणिक व नोकरीमध्ये असलेले आरक्षण वाचविण्यासाठी विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणे अत्यावश्यक आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ, लक्ष्मण हाके व प्रा वाघमारे यांच्यातील भांडण न मिटविता ते समाजासमोर जसेच्या तसे ठेवून नामनिराळे व्हायची भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ओबीसी आरक्षण विरोधात असल्याचा सनसनाटी आरोप केला. महत्त्वाचे म्हणजे ओबीसींचे आरक्षण वाचवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे 100 आमदार निवडून आणणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दि. 28 जुलै रोजी केले.

धाराशिव येथील आर्यन फंक्शन हॉलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर, रमेश बारस्कर, ॲड. रमेश गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल, जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी असल्याचा आरोप करीत दुश्मनों का दुश्मन अपना दोस्त असे कोणीही समजू नये असा मार्मिक सल्ला त्यांनी त्यांनी दिला. तर तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी 7 जुलै 1990 साली ओबीसी आरक्षण लागू केले. मात्र यासाठी जीआर काढण्यात आला नसून त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला असल्याचे सांगत ते म्हणाले की या विरोधात अद्यापपर्यंत कोणी न्यायालयात गेले नाही. त्यामुळे ओबीसींना या आरक्षणाचा फायदा होत आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी होत असून ते योग्य नसून मराठा व ओबीसी यांना वेगवेगळे आरक्षण देणे उचित होईल असे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण हे सरकार व विरोधक या दोघांच्याही हिताचे नाही. कारण ओबीसी भाजप व शिवसेनेचे मतदार आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठा समाज मतदान करीत आहे. मात्र भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष आरक्षण विरोधी असून काँग्रेस व राष्ट्रवादीला याचा फायदा होत नसून हे आरक्षण गेले तर या पक्षांना त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सर्व ओबीसी घटकांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी 50 टक्के जागा मागण्याचा आग्रह धरावा, असे आवाहन त्यांनी केले. जर या पक्षांनी ओबीसी उमेदवार देण्यास नकार दिला तर ओबीसींनी देखील स्वतंत्र उमेदवार उभे करावेत. कारण मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर ओबीसींची संख्या इतर समाजापेक्षा 20 टक्क्यांनी प्रत्येक गावी जास्त असल्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत नक्की निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओबीसींचा राजकीय चेहरा किंवा नेतृत्व नसल्यामुळे त्यांचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी दि.7 ऑगस्ट रोजी झाली आहे. त्याच दिवशी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता दि.7 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे करण्यात येणार आहे. कारण ओबीसींना आपला चेहरा व नेतृत्व निर्माण करण्याची संधी येत्या 7 ऑगस्ट रोजी असून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी या यात्रा सांगता सभेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर, रमेश बारस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक ॲड. के.टी. गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन विकास बनसोडे यांनी व उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे यांनी मानले. या सभेसाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top