धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील  मराठा समाज शांतता रॅली साठी बुधवार दिनांक10 जुलै रोजी धाराशिव येथे येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजन साठी जिल्ह्यातील मराठा समाज बांधव कामाला लागले आहेत. 

जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर चौक येथून होणार असून अण्णाभाऊ साठे चौक, श्री धारासुर मर्दिनी दर्शन, खाजा शमशुद्दीन दर्गा चादर चढवणे, विजय चौक नेहरू चौक काळा मारुती चौक संत गाडगेबाबा चौक ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतता रॅलीची पोहचल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला मार्गदर्शन करतील या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महापुरुषाच्या चौकात त्या त्या समाजाचे बांधव जरांगे पाटलांचे स्वागत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सहा हजार गाड्यांचा ताफा येणार आहे त्याबरोबरच धाराशिव जिल्ह्यातून पाच ते सहा हजार वाहने येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही शांतता रॅली अभूतपूर्व व अविस्मरणीय होण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी 20 दिवसापासून कामाला लागली आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक आयोजित करून पूर्णपणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. उमरगा लोहारा तुळजापूर धाराशिव कळंब वाशी भूम परंडा बार्शी तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यावरूनही समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 5000 स्वयंसेवकाची टीम तयार करण्यात आली आहे. त्यासाठी टी-शर्ट ,आयडेंटी कार्ड देण्यात येणार आहेत.

रॅलीतील समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी जागोजागी  चहा,नाष्ट्याची, पाण्याची, ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या रॅलीत पारंपारिक वाद्य भजनी मंडळी, आराधी मंडळी लेझीम पथक, ढोल पथक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. धाराशिव शहरात प्रत्येक चौक, गल्ली,वार्डात समाज बांधवांची बैठक आयोजित करून जनजागृती करण्यात येत आहे तसेच कळम भूम परंडा वाशी तुळजापूर उमरगा लोहारा, बार्शी या तालुक्यातील ही कार्यकर्ते गावोगावी जाऊन समाज बांधवांना शांतता रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत.  मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या नियोजनासाठी कार्यकर्ते जनजागृतीसाठी वाहनावर बॅनर लावणे, ध्वज लावणे चौका चौकात जनजागृती बॅनर लावणे, जनजागृती वाहन रॅली काढणे, नियोजन बैठका घेणे यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी व भगिनींनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन समाजबांधवातून करण्यात येत आहे.

 
Top