धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वर्ग 2 मधील जमिनी वर्ग 1 मध्ये घेण्याबाबत नेमलेल्या समितीकडून  कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संबंधित समितीला तात्काळ  अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी (दि.10) करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या वतीने वर्ग 2 च्या जमिनी पुन्हा वर्ग 1 मध्ये घेण्याबाबत गेल्या दोन वर्षाासून सतत आंदोलन करण्यात येत आहे. समितीच्या या लढ्याची दखल घेऊन ‌‘मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु अद्यापही समितीकडून अहवाल सादर करण्यात आलेला नाही. 

धाराशिव जिल्ह्यातील सुमारे साडेबारा हजार एकर इनामी, मदत्मास, खिदमत मास सीलिंग जमिनी व महार वतन  जमीन वर्ग 1मधून वर्ग 2 मध्ये घेतल्यामुळे शेतकरी व प्लॉट धारकांवर मोठा अन्याय झालेला आहे. महाराष्ट्रात केवळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी व प्लॉटधारकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून आक्रोश मोर्चा, उपोषण, धरणे आंदोलन, जागरण गोंधळ अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार यांना निवेदने देऊन पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.

त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश जारी केले. सदरील समितीकडून एक महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले होते. परंतु अद्यापही समितीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरी संबंधित समितीला तात्काळ  अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर  समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष राजाभाऊ बागल, फेरोज पल्ला, इलियास मुजावर, अल्लानूर शेख, उमेश राजेनिंबाळकर, सुरेंद्रनाथ मालशेटवार, सतीश कदम, दिलीप राऊत, प्रा. अविनाश मोरे, जयसिंग हजारे, राजू उंबरे, मदन पवार, नवनाथ कांबळे, शीतल पवार, प्रमोद पवार, संजय पवार, अभिजित पवार, अभिजित गिरी, संतोष कुलकर्णी, सौ.सुलभा कुलकर्णी, सतीश पाटील, सरफराज पटेल, ॲड. परवेज काझी, शकील सय्यद व इतर शेतकरी, प्लॉटधारकांची स्वाक्षरी आहे.


 
Top