धाराशिव (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी आपली बलस्थान ओळखून आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि व्यवसायाभिमुख कौशल्य युक्त शिक्षणाची गुणवत्तेला जोड देऊन आयुष्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी केले.

ते ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने रविवार, 9 जून रोजी धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंदौर येथील उद्योजक धनंजय क्षीरसागर, बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर तसेच ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे गजानन घुगीकर आदी उपस्थित होते. ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या गुणगौरव सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी आजचे विद्यार्थी मार्क्सवान होत असताना त्यांना सामाजिक भान असणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी बोलताना उद्योजक धनंजय क्षीरसागर यांनी आपण इंजिनियर नसलो तरी उद्योग उभारू शकतो हे आपल्यावरून सिद्ध झाल्याचे सांगितले. या गुणगौरव सोहळ्याचे प्रास्ताविक ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे गजानन घुगीकर यांनी केले. आभार ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींचा तसेच आयोध्येतील श्री. प्रभूरामचंद्राच्या मुर्तीप्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पौरोहित्य करण्याची संधी लाभलेले धनेश जोशी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, पालक व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top