उमरगा (प्रतिनिधी)-जिजाऊंच्या कुशीत जन्मलेल बाळ सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, सर्वधर्मसमभावाची लाट म्हणजे शिवबा... कुणी म्हणते माझा बाप आमदार हाय, कुणी म्हणते माझा बाप खासदार हाय, कुणी म्हणते माझा बाप जहागीरदार हाय, मी म्हणतो माझा बाप इमानदार हाय.. कुणाला डोळे झाकता रंभा दिसते, कुणाला उर्वशी, मला डोळे झाकता माझी आई दिसते... दु:ख अडवायला उंब-यासारखा, मित्र वनव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.... कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणा-यांनी उभा रस्ता बदलला रे, तिच्या एका इशा-याने, जवा वाचू जिंदगाणीची फाटकी पाने, मनाला मारला लहू तिच्या एका इशा-याने. तुझ्या गावावरुन जवा जाईन मी, तवा तुला चोरुन पाहीण मी... यासह आई, वडील, मैत्री, प्रेम यासह विविध विषयावर कविता सादर करुन प्रसिध्द कवी अनंत राऊत यांनी प्रेक्षकांना हसवत ठेवले. मायबापांच्या कविता ऐकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते.

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि.23) 2024 च्या दहावी परीक्षेत उमरगा लोहारा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील पहिल्या व द्वितीय आलेल्या व बारावी परीक्षेत प्रत्येक शाखेतून प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, दोन्ही तालुक्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांचा सत्कार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना  ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रसिध्द कवी अनंत राऊत (अकोला) होते. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, सुरज साळुंके, लोहारा नगराध्यक्षा वैशाली खराडे, अजित लाकाळ, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, उषाताई गायकवाड, ज्योतीताई चौगुले, ज्ञानज्योती  सामाजिक संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा कु. आकांक्षा चौगुले, उपाध्यक्ष विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, बळीराम सुरवसे, योगेश तपासाळे, पंढरीनाथ कोणे, सचिन जाधव आदीसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उमरगा तालुक्यातील 100 टक्के गुण मिळवलेल्या आदित्य थिटे, उमादेवी बुलबुले, सानिका घोरपडे, पल्लवी पोतदार, लोहारा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल साक्षी कलशेट्टी यांना प्रत्येकी 5 हजार रुपयेचा धनादेश व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिस्थितीतून  आलमस डांगे, रोहित सोलापूरे, रोहित शहापूरे, दिनेश आलमले, चप्पू खाजापाशा, स्वाती पवार या विद्यार्थ्यांना हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन पुढील दोन वर्षे शिक्षण दरमहा दोन हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. यावेळी दोन्ही तालुक्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या 30 शाळाना ज्ञानज्योती पुरस्कार देण्यात आला. तसेच उमरगा तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे होतकरु विद्यार्थ्यांना अभ्यासिका सुरू करुन तज्ञांचे मार्गदर्शन, वाचनाची आवड व्हावी यासाठी वाचनालये सुरू केली तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करणे, शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, गरीब रुग्णांना उपचारासाठी अर्थसहाय्य केले जाते. आम्ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतो. जात, धर्म, पक्ष, राजकीय पक्ष यांचा विचार न करता प्रत्येक व्यक्ती आमचाच आहे हे समजून कामे करतो. 2800 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. शैलेजा तसबे व विजय वडदरे यांनी तर संदिप जगताप यांनी आभार मानले.

जिवाचे व प्रामाणिक मित्रा पेक्षा श्रेष्ठ नात नाही. चार मित्र सोबत आसले तर संपूर्ण आयुष्य सुखात जाते. चांगले विचार करा, चांगल वागा, चांगले मित्र करा. भविष्याच्या जडणघडणीसाठी अथक प्रयत्नांची गरज आहे. पूर्वी इटीकीटी मध्ये अनेक विद्यार्थी आसायचे. आता मोठया प्रमाणावर स्पर्धा वाढली आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करा परंतु जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा आणि नवनवीन बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवा यश निश्चित मिळेल असे आवाहन करुन माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड यांनी कवी मन पिसाळलेल्या कुत्र्यासारख आसत..... तु सुंदर दिसतेच म्हणून मला आवडत नाहीस तर.... अशा कविता सादर केल्या.


पुरस्काराचे मानकरी - शिक्षण क्षेत्रात प्राचार्य डॉ. दिलीप गरुड उमरगा, साहित्यिक मोहीब कादरी दाबका, उद्योजक विक्रम गायकवाड पुणे, आदर्श सरपंच अमर सूर्यवंशी जकेकुरवाडी, प्रगतशील शेतकरी उमेश जाधव तुरोरी, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे एकुरगावाडी, कला क्षेत्रात श्रीराम पोतदार आष्टा कासार, सामाजिक कार्यात रंजिता पवार कदेर तांडा, महिला उद्योजक अस्मिता सुर्यवंशी गुंजोटी यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 
Top