उमरगा(प्रतिनिधी)- मागील आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या मेघराजाचे रविवारी दुपारी पुन्हा आगमन झाले. यामध्ये गुगळगाव, माडज, वागदरी, कोरेगाव, कोरेगाववाडी आदी भागात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे ओढयाला पूर आला, शेतातील पेरलेल्या पिकासह माती वाहून गेली आहे. या भागात केवळ पंधरा दिवसात दुस-यांदा ढगफुटी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

उमरगा तालुक्यात मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे तलाव कोरडे पडले होते. उन्हाळ्यात तीन महिने सुर्य आग ओकत होता. उन्हाने जिवाची काहीली होत आसतानाच रोहिणी नक्षत्रात पावसाच्या आगमनाने नागरीक सुखावले होते. या वर्षी हवामान विभागाने सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर चालू वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी केली आहे. मे महिन्यात भाग बदलून पडलेल्या पावसानंतर जून महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला. जून महिन्यात 10 दिवसापैकी 1, 2 व 4 जून वगळता उर्वरीत 7 दिवस पावसाने हजेरी लावली. 10 जून रोजी उमरगा, नारंगवाडी व मुळज मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. तालुक्यात खरीपाची पेरणी आटोपत आली आहे. यातच रविवारी (दि.23) दुपारी तालुक्यातील माडज, गुगळगाव, कोरेगाव, कोरेगाववाडी, वागदरी आदी भागात मुसळधार पावसामुळे ओढे, नाले व नदीला पूर आला होता. गुगळगावच्या ओढयाला पूर आल्याने पुलावरुन पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश पावसामुळे बांध फुटुन अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचे बांध फुटून मोठया प्रमाणावर माती वाहून गेली आहे. नदी ओढयाला पूर आला आहे. पेरलेल्या पिकासह शेतातील माती वाहून गेली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.


 
Top