उमरगा (प्रतिनिधी)- महायुती सरकारने चालु पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रयासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णाक भुमिका मजबुत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पात्र महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या, कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न 2.5 लक्ष रुपयेपेक्षा कमी असणाऱ्या 21 ते 60 या वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन देण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांनी आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र / रहिवासी दाखला, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, हमीपत्र इत्यादी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांना याकामी गावातील अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / सेतु सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक येथुन अर्ज करता येईल. तसेच नागरी भागात अंगणवार्डी सेविका / नगर परिषद / सेतु सुविधा केंद्र येथुन ऑनलाईन अर्ज करता येईल. तसेच याकामी गावोगावी शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख, शिवदुत व शिवसैनिक सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत. सदर योजनेसाठी 1 जुलै ते 15 जुलै 2024 या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. सदर प्रकियेदरम्यान कोणत्याही लाभार्थ्यास काहीही गैरसोय निर्माण झाल्यास त्यांनी आमच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.  तसेच अर्जदार महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेली पावती जपुन ठेवावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा उमरगा लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 
Top