कळंब (प्रतिनिधी)- प्रचंड त्रास होवूनही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या मागणीवर ठा असलेल्या कळंब डेपोतील वाहक सच्चिदानंद पुरी यांनी आपला निश्चय ढळू दिला नाही. त्यांनी संपूर्ण यंत्रणा हलवून टाकली. आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेच्या सभागृहाचे लक्ष वेधले. तर  शिवसेनेचे नितीन लांडगे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा घडवून आणत पुरी यांचे उपोषण सोडविण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मेघ पाटील यांनी पुढाकार घेतला होता. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी बस वाहक पुरी यांना फोनवरून आश्वासन दिले आणि तब्बल 60 तासांनी पुरी टॉवरवरून शनिवार दि. 29 जून रोजी रात्री उशिरा खाली आले.

गेल्या तीन दिवसापासून म्हणजे गुरूवारी सकाळी 8 वाजता एसटी कमागरांच्या मागण्यांसाठी कळंब आगाराचे वाहक पुरी यांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार फोनवर बोलल्यामुळे आणि आश्वासन दिल्यानंतर तीन दिवसानंतर कर्मचारी टॉवरवरून सुखरूपपणे उतरून खाली आले. कर्मचारी तसेच पुरी यांच्या कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला. झालेल्या संवादानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशानंतर आपण तुमचा हा प्रश्न मार्गी लावू, आपले सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. तुमच्या एसटी कर्मचाऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत आणि अधिवेशनानंतर तुमचे बाकीचे सर्व प्रश्न मी मार्गी लावतो. तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या आणि तुम्ही अगोदर खाली उतरा, असे पुरी यांना आवाहन केले होते.


कुटुंबियासह कर्मचारी आंदोलनात

सातवा वेतन आयोग लागू करावा यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मागील तीन दिवसापासून सच्चिदानंद पुरी यांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून सुरू केलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश येत नसल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. आणखी आंदोलन चिंघळण्याची शक्यता व्यक्त होत होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी कळंब आगाराच्या गेटवर ठिय्या मांडला. तर आंदोलनात पुरी यांचे कुटुंबिय देखील सहभागी झाले होते.

 
Top