धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा,दुष्काळी अनुदान, यासह इतर अनुदान केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची केवायसी नसल्यामुळे सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना आपल्या खात्यावरून उचलणे अडचणीचे  ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत तात्काळ केवायसी करून घ्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे  प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे. 

कोळगे यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकते. परंतु अनेक शेतकरी आपली केवायसी करून घेत नसल्यामुळे त्यांना त्या अनुदानाचा योग्य वेळी उपयोग होत नाही केवळ केवायसी नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पडून आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या गावागावात केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांना मदत करून त्यांची प्राधान्याने केवायसी करण्यासाठी पाठपुरावा करावा व शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे असे आवाहन कोळगे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


 
Top