उमरगा (प्रतिनिधी)- महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे उमरगा शहरासह परिसरातील काही गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. वीजग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने इतर उपकेंद्रातील वीजवाहिन्यांचा वापर करत वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र वीजवाहिन्या अतिभारीत होवून संपूर्ण वीजयंत्रणा कोलमडून जावू नये यासाठी चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा करत विजेचे भारव्यवस्थापन केले जात आहे. महावितरण व महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी बिघाड दुरूस्त करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत असून लवकरात लवकर वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. दरम्यान  संबंधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

महापारेषणच्या  132  केव्ही उमरगा उपकेंद्रातील पॉवर रोहित्र काल (दि.28) रोजी नादुरुस्त झाल्याने 132 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करणाऱ्या 11 केव्ही कोरेगाव (कृषी), कोरेगाव (गावठाण), डाबका (कृषी), गुंजोटी (कृषी) तसेच उमरगा (शहर) वीजवाहिन्यांचा वीज पुरवठा प्रभावित झाला आहे. या वीजवाहिन्यांवरील उमरगा शहरातील डिग्गी रोड, पतंगे रोड, वडरवाडा, मुळज रोड, बालाजी नगर, कोर्ट, तहसील, नगरपरिषद, सिविल हॉस्पिटल, तसेच नागराळ, पळसगाव (तांडा ), एकोंडी, एकोंडी (वाडी), डाबका , चिंचोली, कोरेगाव, कोरेगाव (वाडी ), एकुर्गा, एकुर्गा (वाडी) व गुगळगाव या गावांचा वीज पुरवठा पर्यायी व्यवस्था म्हणून इतर उपकेंद्रातून सुरू करण्यात आला आहे. सदरील वीजवाहिन्या अतिभारीत होऊ नये म्हणून भार व्यवस्थापन करण्यात येत आहे व कृषीपंप वीजवाहिन्यांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. 132 केव्ही उपकेंद्रातील नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी नवीन रोहित्राची  व्यवस्था महापारेषणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. तथापि रोहित्र कार्यान्वित करण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे परिसरातील वीजग्राहकांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा भारव्यवस्थापनाच्या काळामध्ये शांतता राखून महावितरण व महापारेषण कंपनीला सहकार्य करावे तसेच या काळामध्ये आवश्यकते पुरताच विजवापर करावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

 
Top