तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग रस्ते समस्यांचा विळख्यात असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी भाविकांसह ग्रामस्थांमधुन केली जात आहे.

तुळजापूर, सोलापूर राष्ट्रीय महामार्ग  टोल नाका परिसरात असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे  अर्धवट बुजवले आहेत. महामार्ग रस्त्यावर स्वच्छता राखली जात नाही. कठड्यांचे रंगकाम अर्धवट केले जात आहे. तुळजापूर- लातुर  महामार्ग  रस्त्यावर काक्रंबा येथे उड्डाण पुल काम रखडल्याने हा भाग अपघात प्रवण बनला आहे. काक्रंबा ते तुळजापूर जुने बसस्थानक सर्व्हीस रस्ते अर्धवट केले आहेत. अर्धवट कामामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तुळजापूर-सोलापूर बायपास रस्ता वरील सर्व्हीस रस्ता रखडल्याने भाविकांना ञास होत असुन येथे चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे तुळजापूर तालुक्यातील महामार्ग रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांना तारे वरची कसरत करुन वाहने चालवावे लागत आहे. यात मोठ्या प्रमाणात इंधन जावुन याचा फटका वाहनधारकांनाच बसत आहे.

इटकळ येथील राष्ट्रीय चौपदरीकरण महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते. येथील महामार्गावर जागोजागी भले मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना वाहन चालवण्यासाठी तारे वरची कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्षभरात अनेक अपघात होऊन बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले. इटकळ येथे परिसरातील पंधरा ते वीस गावांचा संबंध येतो. त्यामुळे येथे नेहमीच लोकांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. मात्र येथे सुरक्षित असा सर्व्हिस रस्ता नाही ना महामार्ग ही व्यवस्थित नसल्याने येथे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येथील महामार्गावर व पुलावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना वाहन चालवणे असुरक्षित झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा फटका मात्र सर्व सामान्य नागरिक व वाहन धारकांना बसत आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तात्काळ मौजे इटकळ येथील महामार्गावर पडलेले खड्डे व नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी सर्व्हिस रस्ता करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच अझर मुजावर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.


 
Top