मुरूम (प्रतिनिधी) - शहरातील जय मल्हार ग्रुपच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शुक्रवार (ता. 7) रोजी पारंपारिक वाद्यांच्या गजरात शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

प्रारंभी मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, मंडळाचे पदाधिकारी आदींच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक मार्गे हनुमान चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. श्री हनुमान मंदिरास प्रदक्षिणा घालून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य, ढोलवरील विविध आकर्षक खेळांचे प्रकार व नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले, ढोल वाजवत नृत्य सादर करत काटीला बांधलेली दोरी आणि ढोलाच्या नृत्याने त्याला केलेली गुंपन या खेळाने नागरिकांची मने जिंकली. 

डीजेच्या तालावर तरुण व लहान चिमुकल्यांनी ठेका धरला. भांडाऱ्याची उधळण करुन अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करत मिरवणुक पार पडली. यावेळी दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सपोनि पवनकुमार इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जयंती समितीचे अध्यक्ष हणमंत सोनटक्के, उपाध्यक्ष आकाश गाडेकर, सचिव खंडू बन्ने, लक्ष्मण बन्ने, विजयकुमार घोडके, डिंगबर सोनटक्के, सिद्राम सोनटक्के, संजय घोडके, रतन बन्ने, हिरगु सोनटक्के, रामदास बन्ने, म्हाळूशा बन्ने, गंगाधर दूधभाते, दिपक सोनटक्के, महादेव बन्ने महिला भगिनीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळ व पोलीस यंत्रणेकडून सपोनि संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख  बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

 
Top