तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन घेण्यासाठी गेले असता नागरिकांना केवायसी करायला सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांना रेशन दुकानासमोर ताटकळत रांगेत थांबवावे लागत आहे. याचा ञास नागरिकांना होत असल्याने येथे नागरीकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने सुलभ सुटसुटीत अशी उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अमीर शेख यांनी केली आहे.

शासनाने सर्व रेशन दुकानदारांना ग्राहकाकडून केवायसी करून घेण्याचे आदेश दिले असे दुकानदाराकडून सांगितले जात आहे. परंतु यामुळे गोरगरीब नागरिकांना रेशन घेण्यासाठी दुकानासमोर अधिक काळ थांबावे लागत आहे. यामुळे कामासाठी जाणारे शेतमजुर, आजारी वृध्द महिला यांची प्रचंड हेळसांड होत आहे.

एखाद्या कुटुंबामध्ये जितके सदस्य आहेत तितक्या लोकांचे तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन केल्यानंतरच रेशन मिळते. मग दुकानदारांकडून पुन्हा केवायसी कशासाठी असा प्रश्न उद्भवत आहेत. तरी रेशन दुकानदारांनी नागरिकांची हेळसांड करू नये अशी मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे. ग्रामस्थांची हेळसांड न थांबवल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अमीर शेख यांनी इशारा दिला.

 
Top