तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातील संचिकांचा शोध सुरू झाला असून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.  त्यानंतर आता या गायब संचिका शोधण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच काही संचिका सापडल्याचा दावा देखील जिल्हाधिकारी यांनी केला आहे. त्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर सर्व संचिकांची नोंद घेतली जाईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच ज्या संचिका सापडणार नाहीत अशा संचिकांचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून एक दोन नव्हे तर 55 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्या होत्या. यात तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार प्रकरणी व पुरातन नाणी आणि दागिने गायब प्रकरणी आरोपी असलेले दिलीप नाईकवाडी यांची देखील संचिका गायब होती. याबरोबरच मंदिर सुरक्षा संदर्भातील संचिका, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, राज्य अन्वेषण विभागाच्या संचिका, अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या संचिका गायब झाल्या होत्या. मागील दोन वर्षांपासून या संचिका मंदिर संस्थान कार्यालयात नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. त्यानंतर आता या संचिकांचा शोध घेणे सुरू झाले आहे. काही संचिका सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिली.

 
Top