धाराशिव (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जरांगे यांच्याबरोबरच मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील, छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांनी आरक्षणासाठी आयुष्यभर केलेला संघर्ष तसेच मराठा समाजाचा आक्रोश या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असे चित्रपट निर्माते डॉ. दत्ता मोरे यांनी सांगितले.

धाराशिव येथे मंगळवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची तरुणपणीची भूमिका साकारलेले अभिनेते पृथ्वीराज थोरात, मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे (नांदेड), अक्षय नाईकवाडी, संदीप अंधारे, अभिजित सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, संदीप पवार, घनश्याम रितापुरे आदींची उपस्थिती होती. 

मराठा आरक्षणाची चळवळ उभारणारे मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा अधिक तीव्र केला. संपूर्ण मराठा समाज आज जरांगे यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे हा लढा अधिक गतिमान झाला आहे. मराठा आरक्षणाचा धगधगता इतिहास आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे. 

चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे यांनी दमदारपणे साकारली आहे. तसेच आरक्षणासाठी तीव्र लढा दिलेले अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर यांनी प्रभावीपणे साकारली आहे. 

नारायण प्रॉडक्शन निर्मित आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाची कथा-पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. हा चित्रपट सर्वांनी सहकुटुंब पहावा असेही त्यांनी सांगितले.

 
Top