तुळजापूर (प्रतिनिधी)-   तालुक्यातील जळकोट येथून जाणाऱ्या सोलापूर - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्याच्या अनुषंगिक कामे अर्धवट स्थितीत आहेत . ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. अशी मागणी जळकोटचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दि. 1 जून रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.

जळकोट येथुन जाणाऱ्या सदर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे डांबरीकरणाचे काम संबंधित कंपनीकडून पूर्ण करण्यात आहे. जळकोट गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हजार असून गावाच्या मधून हा महामार्ग गेलेला आहे. दररोज हजारो नागरीकांना हा महामार्ग ओलांडून जावे लागते. गावात वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी केवळ एका गतिरोधकाचा वापर केला आहे. यामुळे याठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या निवेदनात पुढीलप्रमाणे अन्य मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गतिरोधकांची संख्या वाढविणे, आलियाबाद रोडकडे शाळा व महाविद्यालये असल्याने पेट्रोलपंपाच्या समोरील उजव्या बाजुस बबन मोरे यांच्या घरासमोर गतिरोधक तयार करणे, सार्व्हिस रोड आणि मुख्य महामार्ग यामध्ये बॅरीकेटींग अथवा जाळी बसविणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (गावात जाणारा मुख्य रस्ता) ते सर्व्हिस रोड, संभाजीनगर भागात जाणारा मुख्य रस्ता ते सर्व्हिस रोड आणि गावातून आलियाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजुनी स्ट्रीटलाईटचे काम करणे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे सदर महामार्गावर ठिकठिकाणी व गतिरोधकांवर थर्मोप्लास्टिक  (पांढरे पट्टे) चे काम तात्काळ करण्यात यावे. या व इतर अनुषंगिक कामांच्या मागणीचे निवेदन यांनी एन. एच. ए. आय च्या प्रकल्प संचालकांना देऊन तातडीने ही सर्व कामे पूर्ण करण्याबाबत मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक धाराशिव यांना दिली आहे.

 
Top