परंडा (प्रतिनिधी) - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दि.8 जून रोजी पासून आमरण उपोषणास सुरु केलेले आहे. या आंदोलनास परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा आहे. सरकारने दोन दिवसात दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा तहसीलदार यांना मंगळवार (दि.11) देण्यात आले. यावेळी मोठ्यासंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की शनिवार दि. 8 जून रोजी पासून अंतरवाली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे 4 दिवसांपासून मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. शासनाने याची आज तागायत दखल घेतलेली नाही. उपोषण करते वेळेस  जरांगे पाटील त्यांची तब्येत ढासळत चाललेली आहे. वाशी येथे ठरल्याप्रमाणे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा व मराठा कुणबी हे एकच आहेत याचा अध्यादेश काढावा, हजारो मराठा आंदोलकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, हैद्राबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट लागू करण्यात यावे, शिंदे समिती मुदतवाढ देऊन समितीचे कामकाज सुरू ठेवावे, ज्या मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत त्यांचा डेटा प्रसिद्ध करण्यात यावा, जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया वरती किंवा जाहीर सभेमध्ये विधान करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, जात पडताळणी समिती धाराशिव येथील मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राचे पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात यावी, परंडा तालुक्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी व सापडलेल्या नोंदी गावपातळीवर जाहीर कराव्यात, परंडा तालुक्यातील गहाळ झालेले रेकॉर्ड तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 
Top