उमरगा (प्रतिनिधी)-जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दमा आजार हा जागतिक स्तरावर सर्वात जास्त रुग्ण असणारा क्रमांक तीनचा आजार आहे. पर्यावरणातील वाढते वायू प्रदूषण, ग्रामीण भागातील महिलांचा चुलीवरील स्वयंपाक व डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणारे विविध कंपन्याचे क्वाईल यामुळे दमा रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तज्ञ डॉक्टरांकडून इलाज न करता झटपट इलाजाच्या मागे लागणे रुग्णांच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. योग्य आणि संपूर्ण औषधोपचार हाच दमा रोगावरील उपाय असल्याचे चेस्ट फिजीशियन व अस्थमा तज्ञ डॉ विजय बेडदुर्गे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शहरात शिवाई हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर सेंटर येथे रविवारी (11) मोफत भव्य दमा प्रशिक्षण व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य शिबिरात शहर व ग्रामीण भागातील शंभराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी 50 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. शिबिरामध्ये उमरगा शहर व परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आले होते. डॉ. विजय बेडदुर्गे यांनी रुग्णांची तपासणी व उपचार करून दमा रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धती या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. जास्त चालल्यावर श्वास गुदमरणे, वारंवार खोकला येणे, सतत सर्दीचा त्रास होणे, श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे, बेडके पडणे, विविध वासांची ऍलर्जी असणे, कारखान्यातील धुरामुळे होणारा दमा, छातीत त्रास असेल, नाकातील हाड वाढणे, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी, थुंकी वाटे रक्त जाणे इत्यादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. दमा आजार अतिशय गंभीर स्वरूपाचा असला तरी काळजी घेतल्यावर आणि योग्य उपचार केल्यावर तो बरा होऊ शकतो. दमा किंवा अस्थमा आजाराचे रुग्ण पाहिले नाहीत असं सहसा होत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील व्यक्तीला दम्याचा त्रास होताना दिसून येतो. 

दम्याची सुरुवात लहानपणात होऊन ती पुढे वयस्क झाल्यावर वाढलेली दिसून येते. अस्थमा हा फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या श्वसननलिकेचे दाहामुळे होत असतो. हा दाह होत असल्यामुळे ही नलिका अत्यंत संवेदनशील होते. दमा आजारासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. काही कारणं जनुकीय असतात. काही घराण्यांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये हा आजार दिसून येतो. यात काही जनुकीय घटक दमा होण्याची शक्यता वाढवत असतात. आजूबाजूच्या वातावरणातील काही घटकही यासाठी कारणीभूत असतात. यासाठी दमा चे अचूक निदान व उपचार यासोबतच रुग्णांना धीर देणे दिलासादायक संवाद रुग्ण व नातेवाईकांनी घ्यायचे दक्षता काळजी यावर भर दिल्याने रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आधार मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सारिका बेडदुर्गे, धनंजय बेडदुर्गे, बरगली बेडदुर्गे यांच्यासह कर्मचारी अजित झंपले, रविशंकर हडपद व इतर उपस्थित होते.

 
Top