कळंब (प्रतिनिधी)-लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये डिकसळ येथील शेकडो महिला पुरुषांसह आज ग्रामपंचायत कार्यालयावर घागरी घेऊन घेराव घालून आंदोलन करण्यात आले. गेली एक महिन्यापासून नळाला पाणी आलेले नाही. तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. गावामध्ये सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. पावसाच्या अगोदर तुडुंब भरलेल्या नाल्या तात्काळ  काढाव्या, जलजीवन मिशनसाठी खोदलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करा यासह सतत जाणारी वीज आदी विविध मागण्या घेऊन आज डिकसळ ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी ग्रामसेवक गव्हाणे तसेच नानासाहेब धाकतोडे त्यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या दोन दिवसांमध्ये पाण्याची व्यवस्था व नाल्या साफ करून घेण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये तात्काळ मुरूम टाकण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वरील विषयी तात्काळ कार्यवाही  झाली नाही तर येत्या आठ दिवसांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकुन आंदोलन करण्याचा इशारा बालाजी गायकवाड सह महिलांनी दिलेला आहे. यावेळी डिकसळ येथील मंदाकिनी गायकवाड,संताबाई वाघमारे, बायडाबाई गायकवाड, अर्चना अडसूळ, सागर गायकवाड, रुपाली गायकवाड, किरन गायकवाड,दत्ता पौळ,राम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड यासह शेकडो महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top