धाराशिव (प्रतिनिधी)-महिन्याचा पगार 2223/- रु. आणि एका गॅस सिलेंडरची किंमत 819/- रु. उरलेल्या 1404/- रुपयात महिनाभर जगायचे कसे? असा प्रश्न ज्ञानाची दारे इतरांना खुली करून देणाऱ्या महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पडला आहे. सार्वजनिक ग्रंथालयायील कर्मचाऱ्यांचा बी पी एल च्या यादीत प्राधान्याने समावेश केला. पाहिजे म्हणजे बी पी एल योजनांचा लाभ तरी  या गरीब बिच्चाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल आणि जीवन थोडं सुसह्य होईल.

कारण सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारची कोणतीही योजना लागू होत नाही.ना पगार, ना पेन्शन, ना आरोग्य सुविधा ना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडे कोणती योजना आहे. बिच्चारे ड वर्ग ग्रंथालयातील ग्रंथपाल 2223 रु.  तर क वर्ग ग्रंथालयातील ग्रंथपाल 4800 रु.महिना( सांगताना शरम वाटेल अशा) मानधनावर वर्षानुवर्षे खर्डेघाशी करीत आहेत.  बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी सरकारने 1 ली ते 7 वी 8 वी ते10 वी,11, 12 वी ते इंजिनिअरिंग, मेडिकल पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ची घोषणा केली आहे. सदर योजना लागूही केली आहे. हे वाचून खूप आनंद वाटला. अशी एखादी योजना तुटपुंजे वेतन मिळणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी का नाही? 2,4,5 हजार रुपये महिना मानधनावर काम करणारे ग्रंथालय कर्मचारी या महागाईच्या काळात आपल्या मुलांना कोणते शिक्षण देऊ शकतील?

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पगारासह अनेक योजना लागू झाल्या आहेत.नेमके ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी या योजना लागू होण्यात काय अडचणी आहेत? ड वर्ग ग्रंथपालाचा पगार आहे महिन्याला  2223 ( बावीसशे तेवीस रुपये फक्त ) या रकमेस पगार म्हणणे हा पगार या शब्दाचा अपमानच आहे. मजुराची सद्याची दिवसाला हजरी-500ते 600 रु.आहे.  मजुरांची 4 दिवसाची कमाई 2000 ते 2400 आहे. तर ड वर्ग ग्रंथपालाचा महिन्याचा पगार 2223/ रु.आहे.

क वर्ग ग्रंथपालाचा महिन्याचा पगार आहे 4800( चार हजार आठशे रुपये फक्त ) म्हणजे मजुराची 8,9 दिवसाची कमाई जिल्हा अ वर्गाचे ग्रंथालय जे कॉलेजच्या ग्रंथालयाएवढे किंवा त्याहूनही मोठे असते. जिल्हा अ वर्गाची काही ग्रंथालये 100 वर्षाची आहेत.येथे  शिपाई या पदावर काम करणाऱ्याचा पगार आहे फक्त 4800/- रुपये. तर मुख्य ग्रंथपालास मिळतो मजुराएवढा पगार दिवसाला 550/- रु.  कोणी ही माहिती आपणास तोंडी सांगितली तर आपणास खरी वाटणार नाही किंवा एवढा कमी पगार असू शकतो हे आपणास खरे वाटणार नाही पण हे खरे आहे .आणि हे एकूणच भयंकर असे आहे.कोणास ही बाब खोटी वाटत असल्यास त्यांनी ग्रंथालय संचालनालयाचे परिपत्रक पाहून खात्री करून घ्यावी. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने ज्यांना वाचन,वाचन चळवळ याविषयी आस्था आहे त्यांनी“ हे असे का आहे?हे बदलत का नाही?

असा प्रश्न शासनाला विचारलाच पाहिजे असे मला वाटते. अशा परिस्थितीत अता नव्या पिढीने मजूर व्हायला प्राधान्य द्यावे की ग्रंथालय कर्मचारी व्हायला प्राधान्य द्यावे याचे उत्तर पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने आणि  सरकारने आता दिलेच पाहिजे असे मला वाटते. हे वाचून आपल्याला काही वाटत असेल तर आपण ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करायला हवेत.

 
Top