कळंब (प्रतिनिधी)-  संत चोखामेळा अध्यासन केंद्र या संत चोखामेळा महाराज व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य यांचे साहित्य, जीवन, कार्य इ संबंधित संशोधन व प्रचार प्रसार जागृतीचे कार्य करत असलेल्या सोबतच वारकरी संप्रदायातील मानवतावादी, बंधुतावादी व समतावादी मूल्यांच्या  उत्कर्ष - संवर्धन सोबतच प्रचार प्रसार कार्यात अग्रणी राहत सामाजिक एकतेच्या कार्यात सातत्याने सजग असलेल्या संत चोखामेळा अध्यासन केंद्र या संस्थेच्या मध्यवर्ती विश्वस्त मंडळावर शैक्षणिक सामाजिक परिघात कार्यरत श्रीमती ए. डी. राऊत यांची  निवड करण्यात आली आहे. 

संत चोखोबांचे अभंग काळाला जिंकून अमर झालेत. त्यातील बंडखोरीच स्फुल्लिंग बावनकशी आहे. मराठी साहित्य विश्वात त्याला तोड नाही ... संत, कवी आणि माणूस म्हणूनही चोखोबा ' मोठे  'च  होतेच, त्यांच्या अभंगात भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत ही जाणवते आणि ‌‘वेदनेचा सूर' ही लागलेला दिसतो, जो आजही आपले अंत:करण हेलावून टाकतो. संत चोखामेळा यांच्या साहित्यकृतीचा जास्तीत प्रचार प्रसार व्हावा या हेतूने संत चोखामेळा साहित्य संमेलन, संत चोखामेळा व परिवार यांच्यावरील संशोधित ग्रंथ संपदा निर्मिती, संत चोखामेळा समता पुरस्कार, चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची ,आदी उपक्रम सातत्याने सुरु असतात. 

 संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा मा प्राचार्या उल्काताई चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखालील विश्वस्त मंडळात श्रीमती राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. संत चोखामेळा महाराज यांच्याशी संबंधित विचार प्रसार कार्यासोबतच भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाने सांगितलेल्या समता, मानवता, बंधुता व सामाजिक न्याय या समाजहितकारक मुल्यांचा जागर करतांना नवीन विश्वस्त तन मन धन याद्वारे सहभागी होतील अशा आशयाचे नियुक्तीपत्र संत चोखामेळा अध्यासनाचे संस्थापक सचिन पाटील यांनी नवीन विश्वस्तांना दिले आहे.

 
Top