धाराशिव (प्रतिनिधी)- माहेराहून घर बांधकामासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून 28 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.शहरात सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या सानप कुटुंबातील 9 जणांवर आनंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गवळी गल्ली भागात सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या सानप कुटुंबातील रंजना किरण सानप ( 28 ) यांनी सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील मुकुंद नगर, स्टेशन रोड या भागात राहत्या घरी गळफास घेतला. तत्पूर्वी रंजना यांनी माहेरच्या मंडळींना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली होती असे सांगण्यात येत आहे. सासरच्या मंडळींनी रंजना यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. ही बातमी मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर रुग्णालयात एकच गर्दी झाली. त्यानंतर डॉक्टरांनी रंजना यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. यावेळी संतप्त झालेल्या रंजना यांच्या नातेवाईकांनी सासरच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, रंजना किरण सानप, (28 वर्षे, रा. मुंकूद नगर, धाराशिव) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. पती किरण बच्चाराम सानप, सासु सुनिता बच्चाराम सानप, सासरे बच्चाराम अग्णु सानप, दिर आण्णासाहेब बच्चाराम सानप, जाऊ सुलभा आण्णासाहेब सानप, त्यांची दोन मुले व भाचा चुलता खाडे (सर्व रा. मुकूंद नगर, धाराशिव) यांनी रंजना हिला घराच्या बांधकामाचे देणे देण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन मानसिक व शारीरीक त्रास दिल्याने त्यांच्या त्रासास कंटाळून रंजना सानप यांनी आत्महत्या केली. रंजनाचे वडील कानिफनाथ भास्कर घुगे (48 वर्षे, रा. इंदापुर ता. बार्शी जि. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं कलम 306, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top