धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील वर्ग 2 च्या जमिनी पुन्हा वर्ग 1 मध्ये घेण्याबाबत पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने शनिवार, 29 जून रोजी पुकारण्यात आलेले धाराशिव बंद आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने रातोरात वर्ग 1 मधील जमिनी वर्ग 2 मध्ये घेतल्याच्या निर्णयविरोधात शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. तरीही मागण्याची दखल न घेतल्याने शनिवार, 29 जून रोजी धराशिव बंदची हाक दिली होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी समिती पदाधिकऱ्यांनी संपर्क साधला असता पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन समितीला दिले. त्यामुळे समितीने बंद आंदोलन स्थगित केले आहे. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ बागल, सुभाष पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top