तुळजापूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे मार्च, २०२४ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रु.३५० कोटी इतका निधि वितरित  करण्याचा निर्णय  महाराष्ट्र शासनाने घेतल्याने  एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारीचा मार्ग मोकळा झाला आहे. 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे मार्च, २०२४ चे सवलतमूल्य उपलब्ध करण्याबाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांनी संदर्भाधिन पत्रांन्वये शासनास विनंती केली होती . त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे मार्च, २०२४ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर  शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे मार्च, २०२४ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रु.३५०.०० कोटी इतकी रक्कम (अक्षरी रूपये तीनशे पन्नास कोटी फक्त) रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला. सदर रु.३५०.०० कोटी हा खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च “मागणी क्रमांक बी-३, लेखाशिर्ष २०४१, वाहनांवरील कर (००) ००१, संचालन व प्रशासन (०१) परिवहन आयुक्त (०१) (०१) आस्थापना - परिवहन आयुक्त, (दत्तमत्त) (अनिवार्य) (२०४१ ००१८) ३३, अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदरचे अर्थसहाय्य हे “बिनशर्त” आहे. 


यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आंहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी. असे निर्णय आदेशात म्हटलं आहे, महाराष्ट्र शासन कार्यासन अधिकारी सारीका मेंढे यांनी हा निर्णय शुक्रवार दि१०मे २०२४ रोजी काढला आहे.

 
Top