धाराशिव - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी रास अर्पण करून आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. महापूजा, आरती करून पवार बंधुंच्या आमराईतील आंबे गाभाऱ्यात आकर्षकपणे मांडण्यात आले. तसेच मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने प्रंसन्न वातावरणात संत तुकोबाचरणी ही सेवा अर्पण करण्यात आली. 


यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, धारूरचे लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद, हभप जगन्नाथ पाटील, हभप जोपाशेठ पवार,  हभप ढमाले मामा, संजीव पवार, हभप अनिल कारके, हभप राजेंद्र महाराज ढोरे, हभप पंडित बसे, हभप राजाराम बोत्रे, हभप नारायण भेगडे, हभप शिवाजी शेलार, विजया कारके, तसेच पवार परिवारातील सदस्य, भाविक उपस्थित होते.  आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. आंब्याचा हा प्रसाद भाविक भक्तांना देण्यात येणार आहे.


अरुण पवार यांनी सांगितले, की माझे बंधू सरपंच बालाजी पवार यांनी मेहनत घेऊन मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या असतानाही टँकर, तसेच शेततळ्याच्या माध्यमातून ५००० केसर आंब्याच्या झाडांचे संगोपन करून शेती फुलवलेली आहे. आमच्या आमराईतील आंबे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवा केली. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणची झाडे सुकून चालली आहेत. आम्हाला ज्या ठिकाणची झाडे पाण्याअभावी सुकत असल्याचे दिसताच पाणी देऊन झाडांना जीवनदान देत आहोत. यावर्षी लवकर पाऊस येऊन पाण्याचा प्रश्न सुटावा, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील शेतकरी माझा बळीराजा सुखी व्हावा अशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज चरणी प्रार्थना केली आहे. 


धाराशिव तालुक्यातील धारूर येथील वृक्षमित्र तथा महाराष्ट्र शासन शिवछत्रपती वनश्री पुरस्कार प्राप्त अरूण पवार व बंधु लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार यांनी कामानिमित्त पुणे पिंपरीचिंचवड गाठून तेथे मराठवाडा जनवीकास संघाची स्थापना करुन.तेथे रहात असलेल्या मराठवाड्याती लोकांसह ईतरही गोरगरीब जनतेसाठी आर्थिक, सामाजिक अश्या स्वरुपाची लागेल ती मदत करून पुणे जिल्ह्यात समाजसेवेचा ठसा व वृक्षसंवर्धनाचा ठसा उमवटला आहे.


 
Top