धाराशिव/ प्रतिनिधी 

अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या "विवेकानंद" अंकाचे प्रकाशन  दिनांक १० मे २०२४ रोजी महाविद्यालयीन विकास समितीचे सन्माननीय सदस्य संजय निंबाळकर यांच्या शुभ हस्ते  करण्यात आले.


याप्रसंगी संजय निंबाळकर म्हणाले की,  विवेकानंद" हे  नियतकालिक महाविद्यालयाचा आरसाआहे .या वर्षातील उपक्रमांच्या आणि एकूणच वर्षभरातील कामकाजाचे ठसठशीत असे प्रतिबिंब विवेकानंद मध्ये पहावयास मिळेल. युवा पिढीचे बदलते स्वरूप, त्यांची विचारधारा आणि एकूण जीवनाकडे पाहण्याची दृष्टी या नियतकालिकाच्या प्रत्येक पानापानात आविष्कृत होताना दिसते. मानवी जीवनातील सुख दुःखाचा जमा खर्च कलात्मक पद्धतीने वास्तवाचे भान ठेवून मांडणी केल्याने यातील  साहित्याला जिवंतपणा प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्याला जे जे भावते ते तेथे तो शब्दांच्या साथीने कागदावर लिहित जातो. त्याची कविता, कथा, विनोद लेख, इत्यादी वाड:मय प्रकार सहज आकार घेत जातात याचाही प्रत्यय विवेकानंद अंकामध्ये येताना दिसतो.

   ते पुढे म्हणाले की, समाजकृतीचा विद्यार्थी मनावर झालेला आघात आणि त्याचा परिणाम किती बोलका आहे?तो आघातच वाड.मय रूप धारण करू शकतो. हा आत्मविश्वास या तरुण पिढीच्या लेखनातून आल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, सावित्रीबाई फुले यांच्यावरील लेखन वाचले म्हणजे या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. आजचे अनेक प्रश्न या नवनीत साहित्यिकांच्या साहित्यातून वाचकाला अंतर्मुख करताना दिसतात. युवा पिढीला स्वामी विवेकानंदा बद्दल आकर्षण वाढते. तर युवा पिढीबद्दल विवेकानंदांना जबरदस्त आत्मविश्वास होता. भारताच्या विकासासाठी तरुणांच्या योगदानाला मोल देताना विवेकानंद म्हणतात, "माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही जर भूतकाळ उगाळीत बसलात तर अधोगतीकडे वाटचाल कराल. या उलट भविष्यकाळावर नजर ठेवून वर्तमान काळ नीट जगला तर तुमच्या भविष्यकाळाचा सूर्योदय विलोभनीय असणारच. मात्र हे सगळे करण्याकरिता आपल्याला सामर्थ्यवान, तेजस व आत्मविश्वासपूर्ण तरुणांची फलटण उभारणे गरजेचे आहे. प्रत्येक भारतीयांनी केवळ सुशिक्षित न बनता सुसंस्कृत बनले पाहिजे." स्वामी विवेकानंद यांच्या विचाराप्रमाणे महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या आदर्शाने, विचाराने संस्कृत बनलेला आहे. असे त्याच्या लेखणीतून दिसते. 

     या नियतकालिकाचे मुखपृष्ठ चंद्रयान -३ आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर  आधारीत बनविण्याची कल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांची आहे.  नियतकालिक अंकाचे प्रमुख संपादक डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले आहे. याबरोबरच विभागीय सहसंपादक म्हणून डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. केशव क्षीरसागर, प्रा. बालाजी कऱ्हाडे( वरिष्ठ विभाग), प्रा. वैभव आगळे, प्रा. मोहन राठोड, प्रा भाग्यश्री गोंदकर यांनी काम पाहिले. या वार्षिक अंकाच्या प्रकाशनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख,  श्री. संजय निंबाळकर( सदस्य,महाविद्यालयीन विकास समिती) डॉ . दत्तात्रय शिंदे,डॉ .मदनसिंग गोलवाल, प्रा. माधव उगिले, श्री कवडे आदी बरोबरच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. 
 
Top