धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील सांगवी येथील हनुमंत अर्जुन कोळपे (वय 84) या व्यक्तीचा रात्री साडे नऊच्या सुमारास पत्र्यावरील दगड डोक्यावर पडून जागीच मृत्यु झाला आहे. दरम्यान रविवारी रात्री झालेल्या तुफान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने यांच्या घरावरील पत्रे उडाले व पत्र्यावरील दगड झोपल्या ठिकाणी डोक्यावर पडल्याने या व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सांगवी येथील हनुमंत अर्जुन कोळपे हे व्यक्ती नेहमी प्रमाणे आपल्या राहत्या घरात (दि.26) रविवारी झोपले होते. या अशी दुर्दैवी घटना घडल्याने सांगवी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यासह गावातील अन्य लोकांची घरावरील पत्रे उडून आर्थिक नुकसानी बरोबर शेतीतील फळ पीकांची झाडे उलमळून पडली आहेत. मागील काही दिवसांपासून संबंध जिल्हाभर अवकाळी पावसाने व तुफान वाऱ्याने थैमान घातले असून अनेक ठिकाणी शेती पिकाच्या नुकसानी बरोबर जीवितहानी व वित्तहानी होत असतानाच सांगवी येथे ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ केली जात आहे.


आमदार, खासदार यांची सांत्वनपर भेट

सांगवी येथील घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी रात्रीच (दि.26)रविवारी साडे दहा वाजता सांगवी गावास भेट देऊन  या  घटनास्थळाची पाहणी करून कोळपे कुटुंबाचे सांत्वन केले.यावेळी तातडीने महसूल विभाग, आरोग्य विभाग, आणि पोलीस प्रशासनाला  पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.


बेंबळीला ही भेट

तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेंबळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी, मजुर व व्यापारी यांना बसलेला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक नागरीकांच्या राहत्या घरावरील पत्रे, जनावरांसाठी केलेले पत्र्याचे शेड उडून गेले. झाडे पडून घरांचे मोठया नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बेंबळी परिसरातील नुकसानीची पाहणी करून प्रशासनास तात्काळ पंचनामे करुन शासनास सादर करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नुकसानग्रस्त नागरीक, शेतकरी, व्यापारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.


 
Top