धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, मंडळ अधिकारी, तलाठी या तिघा विरोधात आनंदनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नियम बाह्य असल्याचा दावा करत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गुरूवार दि. 30 मे रोजी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची महसूल अधिकाऱ्यांनी भेट घेतली असून, महसूल अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांची भेट घेवून आपली कैफियत मांडली. यानंतर पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणी समिती नेमली आहे. यानंतरही महसूल कर्मचारी व अधिकारी आंदोलनावर ठाम आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून, त्यांनी दंडाधिकारी अधिकाराने पोलिस अधीक्षक यांना लेखी पत्र लिहीत आदेत दिले आहेत. गुन्हा नोंद करताना व त्यानंतर अटक करताना अनेक नियम पाळले नाहीत. याबाबत अनेक कायदेशीर संदर्भ जिल्हाधिकारी यांनी पत्रात दिले आहेत. पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्याचा अहवाल दोन दिवसात सादर करावा असे म्हटले आहे. 

 
Top