धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून दिवसभरात एकदा तरी अवकाळी पावसासह वादळी वारे सुरू होवून अतोनात नुकसान होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे पोल आडवे पडले. तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. अनेकांचे सोलार पॅनलचेही नुकसान झाले आहे. या दरम्यान वीज पडून जनावरांसह एका व्यक्तीचा व्हंताळा येथे मृत्यू झाला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. या वादळी वाऱ्यात एका शेतकऱ्याची हातातोंडाशी आलेली केळीची बाग भईसपाट झाली आहे. 



धाराशिव शहर व जिल्ह्यात गेल्या बुधवारपासून अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अवकाळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. धाराशिव शहरातील काही भागात झाडे पडली आहेत. धाराशिव-सोलापूर रस्त्यावर काही ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीसाठी काही काळ हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. तुळजापूर तालुक्यातील किलज येथे वीज कोसळून दोन म्हैशी ठार झाल्या.  तर कळंब तालुक्यातील मोहा येथे वादळी वाऱ्यास पाऊस झाल्याने घरावरील पत्रे तसचे शेतातील जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अशा प्रकाराची परिस्थिती तुळजापूर तालुक्यातही झाली आहे. येरमाळा येथे झालेल्या वादळी पावसाने एका हॉटेलवाल्याचे पत्राचे सेड पूर्ण उडून गेले. गावातील बऱ्याच घरावरील व हॉटेलवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे येरमाळा ग्रामस्थांनी सांगितले आहे. 

कळंब तालुक्यातील शिराढोण येथेही वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे शेड, प्लोटी फार्मवरील पत्रे उडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रमाणाचे हासेगाव, भंडारवाडी, येवती आदी ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. येवतीमध्ये एका शेतकऱ्याची केळीची बाग भुईसपाट झाली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणाण्यानुसार 10 ते 15 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. नुकसानग्रस्त भागाला आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील भेटी देत आहेत.

 
Top