प्रतिनिधी | कळंब

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्याअण्णा भाऊ साठे चौकातील गणेश ट्रेडर्स या दुकानावर व दुकानाच्या वरील मजल्यावर रहाणारे दुकान मालक ब्रिजलाल भुतडा यांच्या राहत्या घरी रविवारी पहाटे दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याममध्ये आठ ते दहा दरोडेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. 

रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी भुतडा यांच्या दुकानासमोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यांनंतर दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील काऊंटर उचकटून त्यात ठेवलेले चार हजार रुपयांवर डल्ला मारला. दुकानाच्या आतूनच असलेला दरवाजा तोडून वरील मजल्यावर असलेल्या घरात प्रवेश केला. घरातील हॉल, बेडरूममधील कपाटे फोडून एक लाख रूपयांचे सोने व दीड लाख रुपये रक्कम लुटली. घरामध्ये आवाज येत असल्याची जाणीव भुतडा पती पत्नीला झाल्याने ते बाहेर आले. दरोडेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी भुतडा यांचा मुलगा लक्ष्मीकांत व सून सुनिता हे बाहेर आले. त्यावेळी दरोडेखोर पळून गेले. दरम्यान एक दरोडेखोर पाय अडकल्याने तेथेच पडला. त्याला भुतडा आणि त्यांच्या मुलाने पकडून ठेवले. यावेळी घरातील महिलांनी पोलीस व शेजाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. या झटापटीत भुतडा यांच्या हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर कळंब येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. 


पोलीसांच्या  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह 

गेल्या वर्षभरात शहराच्या परिघात पेट्रोल पंपावरील दरोडा, एटीएमच उचलून नेणे, आठवडी बाजारातील चोऱ्या, शहरातील बेशिस्त पार्किंग यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरोड्याच्या घटनेबाबत कळंब पोलीस ठाण्यात कलम 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे करत आहेत. 


पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची पाहणी

दरोड्याच्या घटनेनंतर भूम येथील सहायक पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ, पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी भेट दिली. या दरोड्याामधये आठ ते दहा दरोडेखोर असावेत असा अंदाज तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी व्यक्त केला असून त्यानदृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top