प्रतिनिधी | तुळजापूर 

उन्हाळी सुट्यांंच्या पार्श्वभूमीवर कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र तुळजापुरात देवीभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. सोमवारी 41 अंशावर तापमानाचा पारा असताना घामाच्या धारांमध्ये हजारो भाविकांनी सहकुटुंब देवीदर्शन घेतले. वाढलेली गर्दी आणि नियोजनाचा अभाव यामुळे भाविकांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. 

तुळजापूर तीर्थक्षेत्रात शारदीय नवरात्र महोत्सव आणि शांकभरी नवरात्र महोत्सव वगळता इतर कालावधीत मंदिर प्रशासन आणि इतर यंत्रणा लक्ष देत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. सध्या शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापुरात दर्शनासाठी येत आहेत. खाजगी वाहनाने आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यातच उन्हापासून संरक्षणासाठी लावण्यात आलेला पडदा फाटल्यामुळे दर्शन रांगेत अनवाणी थांबलेल्या भाविकांना रखरखत्या उन्हात मोठा त्रास होत आहे. याकडे मंदिर संस्थानची यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  


 
Top