प्रतिनिधी | धाराशिव 

खरेदीखत झालेल्या जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी 4 हजार रुपयांची मागणी करुन 3 हजार रुपयांवर तडजोड करणाऱ्या आंदोरा सज्जाचा तलाठी कल्याण श्याम राठोड यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गजाआड केले आहे. त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील आंदोरा सज्जाचा तलाठी कल्याण राठोड याच्याकडे इटकूर सज्जाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तालुक्यातील एका 25 वर्षीय शेतकऱ्याने त्याच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी तलाठी कल्याण राठोड याची भेट घेतली. तेव्हा तलाठी राठोड याने शेतकऱ्याकडे स्वतःसाठी आणि साहेबांना पण द्यावे लागतील म्हणून 4 हजार रुपये लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती 3 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तरुण शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे लाचलुचत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने 14 मे रोजी लाचेची पडताळणी केली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तलाठी राठोड यास ताब्यात घेऊन कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्यामार्गदर्शनाखाली धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सहायक फौजार इफ्तेखार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांनी ही कारवाई केली. 

कोणताही लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 02472-222879 या क्रमांकावर अथवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले आहे. 

 
Top